नियमित या वेळेस हळदीचं पाणी प्या, मिळतील भरपूर आरोग्यदायी लाभ

हळदीमुळे भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्माचा साठा आहे. गरम पाण्यामध्ये हळद मिसळून प्यायल्यास तुम्हाला दुप्पट आरोग्यदायी फायदे मिळतील. कोणत्या वेळेस हळदीचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीराला कसे लाभ मिळतील? जाणून घेऊया याची माहिती

आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पाककृतींमध्ये गरम मसल्यांचा समावेश केला जातो. यामुळे स्वयंपाकाची चव वाढण्यास मदत मिळते. सोबतच याद्वारे आपल्याला आरोग्यदायी फायदे (Health Care) देखील मिळतात. औषधी गुणधर्मामुळे काही मसाल्यांना आयुर्वेदामध्येही विशेष स्थान देण्यात आले आहे. यापैकीच एक म्हणजे हळद. हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्यामुळे आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. हळदीमध्ये कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडेंटचा समावेश आहे. 

यातील पोषण तत्त्वांमुळे शरीराला आलेली सूज किंवा एखादी दुखापत ठीक होण्यास मदत मिळते. जर तुम्ही न चुकता गरम पाण्यातून हळदीचे (Turmeric Water Benefits in Marathi) सेवन केले तर तुम्हाला दुप्पट लाभ मिळण्याची शक्यता आहे. हळदीचे पाणी कसे तयार करायचे आणि किती प्रमाणात प्यायचे? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

​गरम पाणी आणि हळदीचे फायदे

हळदीमध्ये लिपोपोलीसॅचिरिड चे घटक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. यामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. हळदीमुळे एखादी जखम देखील लवकर भरते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून देखील आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.

हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट, अँटी- ट्यूमर, अँटी सेप्टिक, अँटी वायरल, कार्डियो प्रोटेक्टिव आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म आहेत. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हळदीचे पाणी प्या. वजन घटण्यास नक्कीच मदत होईल. वजन वाढीमुळे हृदय रोग, स्ट्रोक आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत राहतो. पण योग्य प्रमाणात हळदीचे पाणी प्यायल्यास पोट आणि ओटी पोटावरील चरबी कमी होईल. यामध्ये असणाऱ्या कर्क्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.

चिंता, ताणतणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटी एंग्झायटी चे गुण आहेत. ज्यामुळे शारीरिक तसंच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. तसंच यातील अँटी-ऑक्सिडेंट चे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.

मासिक पाळी

काही महिलांना मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो. मासिक पाळीत ओटी पोट, पाठ आणि पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी किंवा हळदीचे दूध पिऊ शकता.

कसे तयार करायचे हळदीचे पाणी?

एक ग्लास गरम पाणी घ्या आणि एका पॅनमध्ये ते उकळत ठेवा. या पाण्यामध्ये आता एक छोटा चमचा हळद पावडर टाका आणि चांगल्या प्रकारे पाणी ढवळत राहा. तुम्हाला हवे असल्यास यामध्ये मधाचा समावेश करू शकता. नियमित सकाळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता.

​या गोष्टी ठेवा लक्षात :-

हळदीचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असेल तरीही हा उपाय करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पित्त किंवा मूतखड्याचा त्रास असल्यास हा उपाय करू नये. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी देखील हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कर्क्युमिनमुळे रक्तातील शर्करा अतिशय कमी होते. हळदीमुळे शरीरातील लोह देखील शोषून घेतले जाते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता असेल तर हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे.

Leave a Reply

Your email address will not be published.