भावकीच्या भांडणात जन्मले दोन जगप्रसिद्ध ब्रँड… जाणून घ्या ‘आदीदास’ आणि ‘प्युमा’ ची खरी स्टोरी…

तर ही रंजक गोष्ट सुरू होते, जर्मनी मधल्या बवारिया प्रांतामधल्या हेरझोगेनोरच या छोट्याश्या शहरातून. या छोट्याश्या शहरात गरीब डॅझलर कुटुंबीय राहत होते, वडील बुट शिवण्याचे काम करायचे तर आई कपडे धुण्याची लॅान्ड्री चालवायची.

कालांतराने त्यांची दोन्ही मुलेही घरीच चप्पल शिवून विकायला लागले व घरखर्चामध्ये हातभार लावायला लागले, त्यांची नाव होती ॲडॅाल्फ डॅझलर व रूडॅाल्फ डॅझलर.

1914-1918 या काळामध्ये युरोपमध्ये पहिलं महायुध्द झाल, या महायुध्दामध्ये जर्मन सैन्यामध्ये अनेक तरूणांप्रमाणे वरील छोट्याश्या शहरातील दोन्ही डॅझलर बंधूही सहभागी झाले.

पुढे जर्मनी युध्द हरल, व्हर्सायच्या तहामध्ये जर्मनीवर जाचक अटी लागल्या, देशांतर्गत प्रचंड बेरोजगारी वाढली. अनेकांच्या नोकर्या गेल्या. तसाच या दोन्ही बंधूसमोरही उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला.

मग ते त्यांच्या मूळ शहरात परतले तर तेथे त्यांच्या आईची लॅान्ड्री सुरू होती. तर दोघांमधील छोटा ॲडॅाल्फ उर्फ ॲडी हा निष्णात बूट शिवणारा कारागीर होता. ॲडीने आईच्या लॅान्ड्री मध्ये बूट बनवायला सुरवात केली. ॲडी बूट बनविण्यासाठी उत्तम प्रतीचा चमडा वापरत असे. त्यांच्या देशात मंदी असूनही त्याचा व्यवसाय हळूहळू भरभराटीला आला.

व्यवसाय भरभराटीला आल्यावर ॲडीला व्यवसाय सांभाळणे कठीण होऊन बसले. तेव्हा त्याने त्याचा मोठा भाऊ रूडॅाल्फ उर्फ रूडी याला भागीदार म्हणून घेतले. आता पुढे ॲडी उत्पादन तर रूडी वितरण सांभाळू लागला.

कंपनीच नाव होत Gebrüder dassler schuhfabrik म्हणजेच डॅझलर बंधूची बूट फॅक्टरी.

त्यांचे बूट अल्पावधीतच खेळाडूंमध्ये लोकप्रिय झाले. 1923 ते 1932 दोघांचा व्यवसाय खूप जोमाने चालला. व त्यांच्यातील बंधूप्रेमही शिखरावर होत.

पण 1932 मध्ये ॲडीने एका उद्योगपतीच्या 16 वर्षीय मुलीसोबत विवाह केला. त्यानंतर हळूहळू मात्र त्यांच्यात खटके उडू लागले. ॲडीची बायकोने रूडीच्या कामांमध्ये स्वारस्य दाखवणे हे रूडीला काय रूचले नाही. पण दोन्ही भावांनी एकत्र बसून तोडगे काढून काम चालू ठेवल.

आता हिटलर जर्मनीच्या सत्तेवर आला होता, तेव्हा जर्मनीमध्ये फक्त खेळाडूंसाठी बूट बनवणारी ॲडी व रूडीची एकमेव कंपनी होती. त्यांना लवकरच हिटलरच्या युथ क्लबला बूट पुरवण्याचा ठेका भेटला. त्यानंतर दोघे बंधू हिटलरच्या नजरेत आले. हिटलर स्वत: शारीरिक तंदुरूस्ती व मैदानी व्यायामांचा पुरस्कर्ता होता. दोन्ही बंधूनी हिच संधी साधून हिटलरच्या नाझी पक्षामध्ये प्रवेश घेतला.

पुढे जाऊन 1936 साली झालेल्या बर्लिन ॲालिम्पिक मध्ये जर्मनीच्या सर्व खेळाडूंनी त्यांच्या कंपनीचे बूट वापरले व भरीव कामगिरी केली, फक्त जर्मनीच नाही तर त्यांनी तेव्हाचा सर्वोत्तम अमेरिकन खेळाडू जेसी ओव्हेन्सला त्यांचे बूट दिले. ओव्हेन्सने त्या ॲालिम्पिक मध्ये प्रतिष्ठेच्या 100 मी शर्यतीसह एकूण 4 सुवर्णपदके जिंकली. तिथून पुढे कंपनीची 3 वर्षे भरभराटीत गेली.

1 सप्टें 1939 ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व दुसर्या महायुध्दाला सुरवात झाली व डॅझलर बंधूच्या कंपनीवर संक्रांत आली. त्यांच्या उत्पादन फॅक्टरीचे रूपांतर सैन्य विषयक वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी होऊ लागला. त्यानंतर जोपर्यंत दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या छोट्या शहराचा ताबा घेतला नाही तोपर्यंत म्हणजेच तब्बल 6 वर्ष ते नाझी सैन्यासाठी उत्पादन करत होते. 6 वर्षानी एकदाच युध्द संपल, संपूर्ण युरोपात शांतता प्रस्थापित झाली, मात्र दोन भावांमधील द्वंद वाढत होत.

दुसर्या महायुध्दानंतर विजयी राष्ट्रांनी जर्मनीला आपापसात वाटून घेतले. त्यात इंग्लंडने उत्तर-पश्चिम (वायव्य), रशियाने उत्तर-पूर्व(ईशान्य), फ्रान्सने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य), अमेरिकेने आत्ताचा सर्वात विकसित दक्षिण-पूर्व (अग्नेय) भाग घेतला.

या विजयी राष्ट्रांनी नंतर संपूर्ण जर्मनीमध्ये नाझीवादाची पाळेमुळे उखाडून काढायला सुरवात केली.

डॅझलर बंधूची कंपनी असलेला बवारिया प्रांत आता अमेरिकेच्या वर्चस्वाखाली आला होता. अमेरिकेने तेथे उच्चस्तरीय नाझी आधिकारी तसेच त्यांच्या समर्थकांना अटक करायला सुरवात केली. अमेरिकन तपास पथकाचा या डॅझलर बंधूवर दाट संशय होता, तर संशयावरून दोघांनाही अटक झाली.

सुरवातीला दोघांनीही आरोपांचे खंडन केले, पण त्यांच्यात युध्दाच्या काळातच संबंध खराब झाले होते व या तपासप्रक्रियेत दोघांनाही एक दुसऱ्याला अडकवून स्वत: कंपनीचा ताबा घेण्याची संधी दिसली.

मोठा रूडी वर्षभर तुरूंगात राहिल्यानंतर वर्षानंतर बाहेर आला मात्र छोटा ॲडी अजूनही तुरूंगातच होता. रूडीने साक्ष देताना ॲडी शस्त्रास्त्रांच सगळ उत्पादन बघत होता त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, अशी साक्ष दिली.

रूडीवर आरोप सिध्द झाले व त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली. त्यासोबतच त्याला कंपनीची मालकी सोडावी लागणार होती.

त्यानंतर त्याच्याबाजूने हेरझोगेनोरच शहराच्या ज्यू महापौराने ॲडीने त्याला युध्दादरम्यान वाचवल्याची साक्ष दिली. या साक्षीनंतर ॲडीची शिक्षा 2 वर्षांवर आली मात्र कंपनीची मालकी त्याला अजूनही सोडावी लागणारच होती.

रूडीने लावलेल्या आरोपामुळे तसेच दीर्घ कालावधीपासून दोघांमध्ये चालत आलेल्या कौटुंबिक तसेच व्यावसायिक संघर्षामुळे त्यांच्यातील दुरावा प्रचंड वाढला होता व दोघांपुढे कंपनीचे 2 तुकडे करून वाटप करण्याशिवाय पर्याय नव्हता.

ॲडीने वाटपामध्ये त्यांची बूट बनवणारी जुनी कंपनी Gebrüder dassler Schuhfabrik हि घेतली. त्याचे ॲडी ADI व आडनावामधले पहिले 3 शब्द DAS म्हणजेच ॲडीडास (ADIDAS) असे नामकरण केले. हो आपणा सर्वांना माहीत असलेला हाच तो ॲडीडास (ADIDAS) ब्रॅंड.

आता मोठा बंधू रूडीनेही नवीन ब्रॅंड तयार करायचा ठरवला. सुरवातीला RUDA हे नाव त्याच्या विचाराधीन होते मात्र नंतर puma schuhfabrik rudolf dassler म्हणजेच आताचा प्रसिध्द ब्रॅंड प्युमा (PUMA) हे नाव दिले.

आता त्यांच्या हेरझोगेनोरच या मूळ छोट्याश्या शहराचे देखील 2 भाग झाले. या शहरातील बहुतांश नागरिक या दोनपैकी एका कंपनीत काम करू लागले. पण दोन्ही कंपन्याचा अजब कायदा होता. विरूध्द कंपनीत काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यासोबत कसल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही.

दोन्ही कंपन्यांच्या मधून ओरच नदी जाते. या दोन कंपन्यामध्ये काम करणारे कामगार, आधिकारी कधीही नदी ओलांडून जात नव्हते, दोन्ही कर्मचार्यांना लागणार्या गरजेच्या वस्तूंची दुकाने, सुपरमार्केट, चित्रपटगृहे एवढच नव्हे तर दोघांचे फुटबॅाल क्लबही वेगवेगळे. बर्लिनची भिंत 1990 साली पडली पण या दोन कंपन्यामधली कटुता कायम होती. पण 2009 साली दोन्ही कंपन्यानी ही कटुता संपवली व एकत्र फुटबॅाल सामन्याचे आयोजन केले.

70 च्या दशकात दोन्ही बंधूचे निधन झाले. पण आता दोघांच्या कंपन्यांचे विश्लेषण केले तर छोट्या ॲडीची कंपनी मोठ्या रूडीच्या कंपनीपेक्षा सरस आहे. बुट बाजारातला मोठा हिस्सा ॲडीडास कंपनीने काबीज केला आहे, अर्थात प्युमाही मोठीच कंपनी आहे. मात्र ॲडीडास शर्यतीत खूप पुढे निघून गेली.

ॲडीडासच्या यशात 1954 फुटबॅाल विश्वचषक अंतिम सामन्याचा खूप मोठा वाटा आहे. सामन्यात सुरवातीलाच हंगेरी 2-0 ने पुढे गेली होती. थोड्याच वेळात तुफान पाऊस सुरू झाला. हंगेरीचे खेळाडू घसरून पडू लागले. पण प-जर्मनीच्या खेळाडूंकडे ॲडीडासचे खाली खिळे असलेले बूट (spikes shoes) असल्याने त्यांनी सामन्यात पुनरागमन करून पश्चिम जर्मनीला सामना व पर्यायाने विश्वचषक जिंकून दिला. तिथून पुढे मात्र ॲडीडासने कधीही मागे वळून पाहिले नाही.

येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, भाऊ एकत्र राहिले तर निश्चितच यशस्वी होतात, मात्र या दोन्ही भावांनी काडीमोड घेऊनही दोघांच्याही कंपन्या प्रचंड यशस्वी करून दाखवल्या व जगासमोर एक वेगळाच दुर्मिळ असा आदर्श घालून दिला.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा…

अशाच मनोरंजक पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले पेज लाइक करा…

Leave a Reply

Your email address will not be published.