सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. जाणून घ्या सब्जाचे गुणकारी फायदे

फक्त या कारणामुळे काही लोक सब्जाचे सेवन करणं टाळतात कारण त्याची चव त्यांना अजिबात आवडत नाही. खरं तर हे पूर्णपणे व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतं की कोणाला काय आवडतं किंवा काय आवडत नाही? जर तुम्ही देखील त्या लोकांमधील एक असाल जे चव आवडत नसल्याने फक्त सब्जा खाणं टाळतात आणि त्याच्या आरोग्यदायी फायद्यांपासून दूर राहत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही सब्जा खाण्याची योग्य पद्धत आणि लाभ सांगणार आहोत. 

यामध्ये आम्ही तुम्हाला सब्जा टाकून एखाद्या पदार्थाला स्वादिष्ट करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स देखील सांगणार आहोत. कदाचित हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज सब्जाचा वापर करुन नाश्ता बनवाल. खरं तर ज्या लोकांना पोटाशी निगडीत समस्या आहेत जसं की अपचन, गॅस, अॅसिडीटी, छातीत जळजळ, अशक्तपणा, थकवा अशा लोकांनी तर आवर्जून सब्जाचे सेवन करावे. कारण सब्जा अतिशय थंड आणि उर्जा प्रदान करणारा पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती!

आरोग्यासाठी सब्जा का आहे आवश्यक?

सब्जा मध्ये लोह आणि मॅग्नेशियम असतं. हे दोन्ही पोषक घटक एकत्र मिळून शरीरातील बल्ड सर्क्युलेशन म्हणजेच बीपी संतुलित राखण्याचं काम करतात. लोहाची मात्रा योग्य प्रमाणात असल्याने सब्जा त्या लोकांसाठी लाभदायक असतात ज्यांना एनीमिया म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता असण्याची समस्या असते. ब्लड फ्लो नियंत्रित ठेवत असल्यामुळे सब्जा त्या लोकांसाठी देखील तितकेच फायदेशीर असतात ज्या लोकांना सतत थकवा जाणवतो किंवा जे लोक थोडसं चालल्यावरही थकल्यासारखं करतात. तसंच सब्जा आपल्या आर्टरिजमध्ये जमा होणारे फॅट रोखतात जेणे करुन ब्लड सर्क्युलेशन योग्य राहते. सब्जाच्या नियमित सेवनाने हृदयाच्या आजारांपासूनही दूर राहता येते.

सब्जा तुम्ही गव्हाच्या पंजीरीमध्ये साजूक तूप टाकून आणि भाजूनही खाऊ शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला एका कढईमध्ये साजूक तूप घेऊन ते गरम करावे लागेल. जेव्हा तूप वितळू लागेल आणि गरम होईल तेव्हा त्यामध्ये सब्जा टाकून ५ ते १० सेकंद ते परतून घ्या. आता या सब्जा आणि तूपाच्या मिश्रणात एक वाटी गव्हाचं पीठ घाला. हे पीठ तोपर्यंत भाजत राहा जोपर्यंत त्याचा रंग लालसर गुलाबी होत नाही. कारण असा रंग आल्यावर पीठ चांगलं भाजलं गेलंय असं मानलं जातं. आता या पीठात स्वादानुसार मीठ, किसलेलं ओलं खोबरं आणि ड्राय फ्रुट्सचे काही तुकडे मिक्स करा. अशाप्रकारे तयार आहे तुमची टेस्टी आणि हेल्दी पंजीरी! तुम्ही या पंजीरीचा दूधासोबत आस्वाद घेऊ शकता किंवा पिकलेलं केळं यामध्ये कुस्करुन टाकूनही खाऊ शकता.

तुम्ही सब्जा बियांचे सेवन साबुदाणा खीर किंवा खिचडीसोबतही करु शकता. एक दिवस खीर आणि एक दिवस खिचडी असा बेत तुम्ही आखू शकता. खीर बनवण्यासाठी साबुदाणा तुम्हाला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा लागेल जेणे करुन सकाळपर्यंत तो चांगला फुलेल. साबुदाणा फुलून आल्यानंतर एका पॅनमध्ये साजूक तूप घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फुड ग्रेड नारळाचं तेलंही वापरु शकता. जेव्हा तूप गरम होऊन वितळू लागेल तेव्हा त्यात सब्जा टाकून परता. पुढे साबुदाणे पाण्यातून काढून सब्जा आणि तूपासोबत भाजून घ्या. आता५ ते १० सेकंदांनंतर यामध्ये सामान्य तापमान असलेले दूध घाला आणि मंद आचेवर २० ते २५ मिनिटे शिजवा. नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक अशी साबुदाणा खीर तयार आहे.

जर तुम्ही त्या लोकांमधील एक असाल ज्यांना गोड खायला आवडत नाही किंवा डायटिंगवर असाल तर तुम्ही सब्जा टाकून साबुदाणा खिचडी बनवू शकता. यासाठी देखील साबुदाणे रात्रभर भिजत घाला. सकाळी साबुदाणे पाण्यातून काढून सब्जा आणि तूपामध्ये साधी खिचडी बनवताना भाजून शिजवतात तसं शिजवून घ्या. त्यात तुम्ही स्वाद वाढवण्यासाठी शेंगदाण्यांचे कुट टाकू शकता. तसंच चवीनुसार मीठ आणि स्वादासाठी थोडीशी चिमुटभर साखर देखील घालू शकता.

सब्जाचे फायदे

सब्जाचे बी पाण्यातून, दूधातून किंवा सरबतातून घेतल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन उष्णतेचे विकार कमी होण्यास मदत मिळते. कारण सब्जा मधील गुणधर्म शरीर थंड ठेवतात. तसंच सब्जा टाकून सरबत प्यायल्याने लघवीदरम्यान होणारा दाह आणि वेदना कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात होणा-या युरिन इन्फेक्शनचा धोका कमी होतो. सोबतच ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी सब्जाचे सेवन आवर्जून करावे. सब्जा पित्ताचा त्रासही कमी करते. मधुमेहाच्या रुग्णांनी सब्जा खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. तोंड येणे, मुरुम येणे, पुटकूळ्या येणे, जळजळ, त्वचेवर लालसर चट्टे येणे हे विकार सब्जामुळे दूर होतात. सब्जामधील फायबर पचनक्रिया सुरुळीत करण्यास मदत करतं. सब्जामधील लोह, प्रथिने, जीवनसत्वे केस लांब व दाट करण्यास मदत करतात.

सब्जा सरबत

सरबत १ – सब्जा अर्धा तास भिजत ठेवावं. भांड्यात पाणी घ्यावे व त्यात गुळ, वेलची पूड, सैंधव मीठ घालून गुळ विरघळू द्यावा. पावडर गुळ लवकर विरघळतो.आता त्यात लिंबाचा रस मिक्स करावा आणि गार्निशिंगसाठी पुदिन्याची पाने तोडून सरबतात घालावीत.

सरबत २ – एका ग्लासमध्ये पिण्याचे पाणी घ्या. पाण्यामध्ये लिंबू रस मिक्स करा. आता 2चमचे साखर पाण्यात मिक्स करून घ्या. पाण्यात साखर पूर्ण विरघळून झाल्यावर त्यात एक चमचा भिजवलेला सब्जा व मीठ टाकून पाणी ढवळून घ्या. बर्फ घालून गारेगार सरबत सर्व्ह करा..

Leave a Reply

Your email address will not be published.