या थरारक समुद्र प्रवासाची सत्यकथा वाचून तुम्हालाही पटेल जगात चमत्कार घडतात

‘प्रशांत महासागर’ म्हणजेच पॅसिफिक महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे. पृथ्वीचा जवळपास एक तृतियांश भाग पॅसिफिक महासागराने व्यापला आहे. जगातील सगळ्या भूभागापेक्षा प्रशांत महासागर मोठा आहे.

समजा जर तुमची नाव या प्रशांत महासागरात भरकटली तर तुम्हाला परत जमीन दिसेल ही शक्यता अगदीच नगण्य आहे. पण एका नशीबवान अवलिया व्यक्तीच्या नावावर एक जागतिक विक्रम अपघातानेच नोंद झाला आहे. प्रशांत महासागरात हरवल्या नंतर सर्व संकटांना सामोरं जात सर्वात जास्त दिवस जिवंत राहण्याचा तो विक्रम. हा विक्रम मोडावा अशी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची इच्छा सुद्धा होणार नाही. हा विक्रम करणारा अवलिया म्हणजेच ‘जोस साल्वाडोर अल्वारेंगा’ होय. जोस हा मेक्सिको चा रहिवाशी आहे.

जोस हा मेक्सिकोचा हुशार आणि अनुभवी कोळी होता. 2012 च्या नोव्हेंबर महिन्याच्या 17 तारखेला जोस आणि त्याचा ‘इझिकिल कोरडोबा’ नावाचा एक साथीदार मेक्सिकोच्या पूर्व किनाऱ्यापासून जवळ असलेल्या ‘कोस्ता अझुल’ नावाच्या बंदरावरून एक छोटीशी नाव घेऊन मासेमारी करण्यासाठी प्रशांत महासागरात गेले.

मेक्सिकोच्या हवामान खात्याने समुद्रात वादळ येण्याचा इशारा दिलेला असतानाही जोस आणि त्याचा साथीदार इझिकिल नाव घेऊन समुद्रात गेले. फक्त 24 ते 30 तास मासेमारी करून वादळापूर्वी परत येण्याचा त्यांचा विचार होता. त्यांफहे नावेवर स्वयंचलित मोटार आणि पकडलेले मासे साठवण्यासाठी एक छोटासा फ्रीज एवढंच साहित्य होत.

जोस आणि त्याच्या साथीदाराला फक्त 30 तास मासेमारी करायची होती त्यामुळे त्यांनी हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. त्यांनी असा विचार केला की वादळ येण्यापूर्वी आपण मासेमारी करून किनाऱ्यावर परत येऊ. आणि ते किनाऱ्यापासून 120 किलोमीटर आत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले. त्यांनी थोडा वेळ मासेमारी केली असेल तेवढ्यात वातावरण बिघडायला सुरुवात झालेली. त्यामुळे त्यांनी किनाऱ्याकडे परत जाण्याचा विचार केला.

परतीच्या प्रवासात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना ना जोस ला होती ना त्याच्या साथीदाराला. किनाऱ्याकडे परत येत असताना रात्री 1 वाजता वादळ त्यांना धडकले. त्या भयंकर वादळात जोस ची ती छोटीशी नाव हलकावे खाऊ लागली. त्यांना पुढे जाणंही मुश्किल होऊ लागलं. वादळ आणि वाऱ्यामुळे त्यांच्या त्या छोट्या नावेत पाणी शिरू लागलं होतं. त्यामुळे त्यांची नाव बुडायला लागली. या सर्वामुळे नावेवरचं वजन कमी करणं गरजेचं होतं. त्या दोघांनी जेवढे मासे पकडले होते ते सगळे परत समुद्रात फेकून दिले.

ते दोघे किनाऱ्यापासून 6 तासाच्या अंतरावर होते. त्यामुळे वादळात सापडून मरण्यापेक्षा प्रवास करून किनाऱ्याकडे जाण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला. रात्री 1 ते सकाळी 7 पर्यंत प्रवास केल्यानंतर ते दोघे त्यांच्या नेहमीच्या किनाऱ्यापासून फक्त 24 किलोमीटर दूर होते. त्यांना नावेतून डोंगर सुद्धा दिसू लागले होते.

त्यांच्या सुदैवाने त्यांच्या नावेत असलेला रेडिओ चालू होता त्यावरून त्यांनी आपल्या मालकाला आपलं लोकेशन सांगून आपण येत असल्याचे सांगितलं. पण त्याचं दुर्दैव पुढे होतं.

त्यांच्या नावेतील मोटार खराब झाली. त्यामुळे त्यांची नाव एका जागी थांबून राहिली. त्यांची नाव पूर्णपणे स्वयंचलित होती, त्यामुळे त्यांच्या नावेत नाव हाकण्यासाठी वल्हे अथवा पॅडल्स सुद्धा नव्हते. तशातच दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे त्यांच्या जवळ असलेल्या रेडिओची बॅटरी संपली. आता मात्र हताशपणे समोर दिसणाऱ्या किनाऱ्याकडे पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दोघांकडे उरला नव्हता.

मोटार खराब झालेली होती आणि वल्हे किंवा पॅडल्स नसल्यामुळे जोस आणि इझिकिल यांचा नावेवर कसलाच कंट्रोल राहिलेला नव्हता. वादळ नेईल तिकडे त्यांची नाव भरकटत होती. वादळामुळे नाव अजून खोल समुद्रात जात होती. नाव जसजशी आत जात होती त्यांच्या नजरेत आलेले डोंगर परत नजरेआड गेले.

त्यांची नाव भरकटून 2-3 दिवस झाल्यानंतर जोस आणि इझिकिल चे कुटुंबीय चिंतेत पडले. त्या दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या मालकावर दबाव टाकून त्यांचा शोध घ्यायला लावला. त्या दोघांशी शेवटचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या लोकेशन वर मालकाने शोधपथकला पाठवले. त्या पथकाने त्या लोकेशन वर आणि आसपासच्या परिसरात काही दिवस शोध घेतला. पण वादळाने जोस ची नाव समुद्रात दूरवर नेली होती. ते त्या लोकेशन पासून 450 किलोमीटर दूर होते. त्यांची नाव अतिशय लहान असल्यामुळे जोस ला एका गोष्टीची जाणीव होती की जर आपला शोध घेतला जात असेल तर आपण विमान अथवा हेलिकॉप्टर मधून दिसणार नाही.

काही दिवसांतच नावेवर असलेला अन्नसाठा संपून गेला तर त्यांनी समुद्रातुन लहान मासे आणि समुद्रात उडणारे पक्षी यांची शिकार करून ते खाऊ लागले. त्यांना समुद्रात तरंगत असलेल्या प्लास्टिक च्या बाटल्या सापडल्या त्यात पावसाचे पाणी साठवून ते त्यांनी पिण्यासाठी वापरलं. जेव्हा काही दिवस पाऊस पडलाच नाही तेव्हा त्यांनी पकडलेल्या कासवांच रक्त आणि स्वतःचं मूत्र प्यायला सुरुवात केली.

एका छोट्याश्या नावेत ते दोघे खोल समुद्रात चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या अवस्थेत एकमेकांशी काय बोलणार आणि किती बोलणार. वेळ घालवण्यासाठी पाण्यात हात घालून मासे पकडने किंवा झोप काढणे एवढंच काय ते करू शकत होते.

एका मागोमाग एक असे करत तब्बल 4 महिने निघून गेले. आता मात्र जोस चा साथीदार इझिकिल हा धीर सोडायला लागला होता. कच्चे मासे, पक्षी असं सतत अपचनी खाणं खाऊन त्याची तब्येत बिघडायला लागली होती. आता त्याने काहीही खाण्यास आणि पिण्यास मनाई केली आणि त्यामुळे उपासमारीने इझिकिल चा मृत्यू झाला. आता त्या विशाल प्रशांत महासागरात त्या छोट्याश्या नावेत जोस एकटाच राहिला.

नंतर जोस ने असा दावा केला की त्याच्या जवळून एक मालवाहू जहाज गेलं, जोस ने जीवाच्या आकांताने ओरडून त्या जहाजावरील लोकांचं लक्ष वेधून घेतलं, त्या लोकांनी त्याला हातही दाखवला. पण ते थांबले नाहीत.

जोस चा साथीदार इझिकिल चा मृत्यू होऊन आता 11 महिने झाले होते. जोस च्या नावेने आता पर्यंत जवळपास 8000 किलोमीटर चा प्रवास केलेला होता. जोस ने एकट्याने हा प्रवास केलेला होता. एवढ्या कालावधीत त्याच्या कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या झाल्या होत्या. त्याच्याजवळ त्याचा स्वेटर तेवढा टिकलं होत. जोस च्या दाढी आणि केसांत मोठी वाढ झालेली होती. आता त्याची प्रकृती सुद्धा बिघडत चालली होती.

विशालकाय प्रशांत महासागरात एका छोट्या नावेतुन 438 दिवस प्रवास केल्यानंतर अखेर 2014 जानेवारी 30 चा दिवस उगवला तो जोस साठी आशेचा किरण घेऊन. जोस ला समुद्रात आजूबाजूला नारळ तरंगत असलेले दिसू लागले, काही छोटे पक्षीही त्याच्या नावेजवळ घिरट्या घालत होते. जोस ला समजलं की तो किनाऱ्यापासून जवळ आहे. आधी त्याला वाटलं की हे एक मानवरहीत बेट असावं. पण काही वेळाने त्याला किनाऱ्यावर एक छोटं घर दिसलं. त्याच्या नावेत वल्हे किंवा पॅडल्स नसल्यामुळं त्याला त्या घराजवळ पोहोचायला जवळपास अर्धा दिवस लागला होता.

समुद्रात भरकटला तेव्हापासून आजपर्यंत पहिल्यांदा त्याला किनारा लागला होता. किनाऱ्यावर जसा तो आला त्याने नावेतुन बाहेर उडी मारली आणि जीवाच्या आकांताने तो त्या घराकडे पळत सुटला. त्या घराचा दरवाजा जोरजोरात ठोठाऊ लागला. आतून एक माणूस बाहेर आला. जोस ने त्या माणसाला जोरात मिठी मारली. वादळात भरकटत गेल्यानंतर त्याचा साथीदार इझिकिल वगळता त्याला दिसलेला हा पहिला मनुष्य होता.

जोस च्या बेटावर उतरला ते बेट होतं ‘इबॉन अटॉल’. मार्शल बेटांच्या मालिकेतील सर्वात छोटं बेट होतं इबॉन अटॉल. जोस ने हे बेट चुकवलं असतं तर त्याच्या पुढचा स्टॉप असला असता 5000 किलोमीटर वर असलेलं फिलिफाईन्स बेट. त्या बेटावर पोहोचण्यासाठी जोस ला आणखी 240 दिवस प्रवास करायला लागला असता.

या चित्रात मध्ये जो बिंदू दिसत आहे ते इबॉन अटॉल हे बेट जोस च्या मदतीला धावून आलं.

नंतर जोस ला त्याच्या मूळ शहरात म्हणजेच मेक्सिकोच्या ‘इल साल्वाडोर’ इकडे विमानाने पाठवण्यात आलं. तो 11 दिवस हॉस्पिटल मध्ये होता.

जोस च्या प्रवासावर अनेक लोकांनी, मीडियाने त्याची मुलाखत घेतली. जोस च्या प्रवासावर ‘438 डेज: ऍन एक्स्ट्राऑर्डनरी ट्रू स्टोरी ऑफ सर्व्हायवल ऍट सी’ हे पुस्तक सुद्धा आलं. जोस खूप लोकप्रिय झाला.

जोस चं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर इझिकिल च्या घरच्यांनी जोस वर 10 दशलाख डॉलर चा दावा दाखल केला. त्यांनी असा आरोप केला की जोस ने प्रवासा दरम्यान अन्नसाठा संपल्यानंतर इझिकिल ला मारून खाल्लं.

विचार करा 8000 किलोमीटर प्रवास, तो ही एका 7 मीटर च्या नावेतून. प्रवास अपघातानेच घडला पण त्यातील थरार, जीव वाचवण्याची धडपड, साथीदाराला गमावल्यानंतर सुद्धा 11 महिने एकट्याने प्रवास करून जिवंत राहणं. सलाम जोस च्या जिद्दीला, त्याच्या इच्छाशक्तीला.

Leave a Reply

Your email address will not be published.